औरंगाबाद- सुटी संपवून गुरुवारी रुजू झालेले महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक हे १८ जानेवारीपासून परदेश दौर्यावर जाणार आहेत. या दौर्यानंतर त्यांची इतरत्र बदली होणार असल्याची चर्चा मनपा वर्तुळात रंगली आहे.
कचराकोंडीच्या काळात सरकारने मे महिन्यात डॉ. निपुण विनायक यांची
मनपा आयुक्तपदी बदली केली. शहरातील कचराप्रश्न निकाली काढण्यासाठीच
त्यांना पाठविल्याचे प्रशासकीय स्तरावरुन त्यावेळी सांगण्यात आले. आता कचरा
प्रक्रिया प्रकल्पाच्या निविदा मार्गी लागल्या आहेत. दुसरीकडे डॉ. निपुण विनायक
यांना पदोन्नतीही मिळाली आहे. त्यामुळे त्यांची मंत्रालयात सचिव म्हणून बदली होणे
अपेक्षित आहे. डॉ.विनायक हे २५ डिसेंबरपासून दहा दिवसांच्या रजेवर
गेले होते. ते गुरूवारी (१० जानेवारी) मनपात रुजू झाले. त्यानंतर
येत्या १८ जानेवारीपासून ते ४ फेब्रुवारीपर्यंत ते
कॅलिफोर्नियाच्या दौर्यावर जात आहेत. त्यांचा हा दौरा सरकारी असून, यामध्ये ते कॅलिफोर्नियातील घरांच्या
प्रकल्पांचा अभ्यास करणार आहेत.